ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बिभीषण रोडगे यांना “शिक्षण व सामाजिक कार्य राष्ट्रीय पुरस्कार २०२६” जाहीर. Bibhishan Rodge announced as recipient of the "National Award for Education and Social Work 2026".

बिभीषण रोडगे यांना “शिक्षण व सामाजिक कार्य राष्ट्रीय पुरस्कार २०२६” जाहीर.

Bibhishan Rodge announced as recipient of the "National Award for Education and Social Work 2026".
Bibhishan Rodge announced as recipient of the
"National Award for Education and Social Work 2026".
परंडा दि. ८ (रंगोली न्यूज) – शिक्षण, सामाजिक कार्य तसेच कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “शिक्षण व सामाजिक कार्य राष्ट्रीय पुरस्कार २०२६” हा पुरस्कार श्री शिवछत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ, बावचीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ बिभीषण रोडगे यांना जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्काराची घोषणा एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान, निवड समितीचे अध्यक्ष सुरेश हिवराळे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी केली आहे. पुरस्कार वितरण सोहळा दि. ११ जून २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता मुंबई येथील मराठी पत्रकार भवन, मनपा मार्ग, आझाद मैदान येथे जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.

बिभीषण रोडगे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व संस्कारमूल्यांवर आधारित शिक्षण मिळावे या उद्देशाने सन २००२ मध्ये बावची येथे “बावची विद्यालय”ची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात अल्प विद्यार्थीसंख्या, आर्थिक मर्यादा आणि विविध अडचणींवर मात करत त्यांनी शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली. विद्यार्थ्यांच्या वाढत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सन २०१३ मध्ये शाळेचे स्थलांतर परंडा शहरात करण्यात आले.

अत्यंत कमी पटसंख्येपासून सुरू झालेल्या या शाळेने गुणवत्तेच्या बळावर आज मोठी झेप घेतली असून संस्थेतील विद्यार्थी संख्या अडीच हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिस्तबद्ध वातावरण, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संस्था आज तालुक्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक बनली आहे.

श्री शिवछत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सध्या बावची विद्यालय परंडा, राजे शिवाजी पब्लिक स्कूल परंडा आणि वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा या संस्था यशस्वीपणे चालविल्या जात आहेत. ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांना शहराच्या तोडीस तोड शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी परंडा येथे आधुनिक सुविधांनी युक्त भव्य चार मजली शैक्षणिक संकुल उभारले आहे. उत्कृष्ट निकाल, शिस्त आणि गुणवत्तेमुळे हे संकुल तालुक्यात विशेष ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे.

बिभीषण रोडगे हे शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही सक्रियपणे कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे लातूर विभागीय अध्यक्ष म्हणून कार्य करत असून विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे यासाठी त्यांनी खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सन २००४ पासून सातत्याने लढा उभारला आहे. विविध आंदोलने, मोर्चे, बैठका आणि शासन स्तरावरील पाठपुराव्याच्या माध्यमातून त्यांनी शिक्षक, संस्था चालक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या बिभीषण रोडगे यांनी श्री संत ज्ञानेश्वर प्रशाला, लोणी (ता. परंडा) येथे सहशिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रदीर्घ प्रवास केला आहे. त्यांच्या कार्यकाळात शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसह भौतिक सुविधांच्या विकासालाही मोठी चालना मिळाली. विद्यार्थ्यांचा दर्जेदार निकाल, शिस्तबद्ध वातावरण आणि शिक्षकांमधील समन्वय यामुळे शाळेने उल्लेखनीय प्रगती साधली.

शिक्षण आणि सामाजिक कार्यासोबतच कृषी क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शेतीविषयी असलेल्या विशेष आवडीमुळे त्यांनी आधुनिक, नियोजनबद्ध आणि आदर्श शेती उभी केली आहे. सेवानिवृत्तीनंतरही ते शेतीमध्ये सक्रिय असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम उत्पादन घेत आहेत. त्यांच्या शेतीतून परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे.

याचबरोबर आमदार तथा माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत आणि आमदार विक्रम काळे यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी सामान्य नागरिकांशी कायम जवळीक ठेवत विविध प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भावना व्यक्त करताना बिभीषण रोडगे म्हणाले, “हा सन्मान माझा नसून संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, सहकारी आणि समाजातील सर्व घटकांच्या सामूहिक परिश्रमांचा गौरव आहे. या पुरस्कारामुळे समाज, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल परंडा तालुक्यासह शिक्षण, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातून बिभीषण रोडगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments