Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शिक्षण व्यवस्थेचा खरा सन्मान म्हणजे कॉपीमुक्त परीक्षा! ...


शिक्षण व्यवस्थेचा खरा सन्मान म्हणजे कॉपीमुक्त परीक्षा! .....

परंडा - दि. १३) सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या सार्वजनिक परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षा केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक टप्पा नसून त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. प्रशासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की, परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणातच पार पाडाव्यात. या सूचनांचे काटेकोर पालन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

         शिक्षण व्यवस्था ही समाजाचा कणा आहे. शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र संचालक आणि शिक्षणाशी संबंधित प्रत्येक घटक हा या व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. जर परीक्षांमध्ये गैरप्रकार, कॉपी किंवा कोणत्याही प्रकारची शिथिलता दिसून आली, तर त्याचा थेट परिणाम शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर होतो. पालक आपल्या मुलांना मोठ्या अपेक्षेने शाळेत पाठवतात. त्या विश्वासाला तडा जाऊ नये, याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.

     आपण वर्षभर विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे, मेहनतीने आणि समर्पणभावनेने शिक्षण देतो. मग परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रकारची तडजोड का करावी? विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवायचे असेल, तर त्यांना प्रामाणिक परिश्रमाचे महत्त्व शिकवणे गरजेचे आहे. कॉपी करून मिळवलेले यश तात्पुरते असते; पण प्रामाणिक प्रयत्नातून मिळालेले यश आयुष्यभर टिकते.

        हीच मुले उद्याच्या भारताचे नागरिक, अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, अभियंते आणि नेतृत्व करणारे घटक आहेत. आपणच जर चुकीच्या गोष्टींना मूकसंमती दिली, तर भविष्यातील समाजव्यवस्थेवर त्याचे दुष्परिणाम होतील. परीक्षा केंद्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेची चर्चा विद्यार्थी बाहेर पडल्यावर करतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात एखादी घटना क्षणार्धात सोशल मीडियावर, वृत्तवाहिन्यांवर पोहोचते. त्यामुळे एखाद्या केंद्रातील छोटासा गैरप्रकारही संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची प्रतिमा मलिन करू शकतो.

     म्हणूनच सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक यांनी अत्यंत दक्षता, शिस्त आणि पारदर्शकता राखून परीक्षा पार पाडाव्यात. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे, परंतु कोणत्याही प्रकारे नियमभंग होऊ देऊ नये. शिस्तबद्ध, शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे हीच खरी देशसेवा आहे.

      शिक्षण व्यवस्थेचा सन्मान, शिक्षकांचा आत्मसन्मान आणि पालकांचा विश्वास टिकवायचा असेल, तर कॉपीमुक्त परीक्षा हा एकमेव रामबाण उपाय आहे, असे माझे ठाम मत आहे.

चला, आपण सर्व मिळून प्रामाणिकपणाची परंपरा जपूया आणि विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करूया. ........

        नारायण खैरे, प्राचार्य 

वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा, बावची विद्यालय, परांडा


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी.... 

रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com

-: शहाजी कोकाटे :-

मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments