भोंजा येथे दोन शेतकरी गटांचा ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ स्पर्धेत सहभाग

गटशेतीतून स्मार्ट शेतीचा नवा आदर्श; राज्यस्तरावर तब्बल ५० लाखांचे प्रथम पारितोषिक

Two Farmer Groups from Bhonja Participate in the ‘Satyamev Jayate Farmer Cup 2026’ Competition.
Two Farmer Groups from Bhonja Participate in the ‘Satyamev Jayate Farmer Cup 2026’ Competition.

परंडा – दि. १६ (रंगोली न्यूज) : 

Two Farmer Groups from Bhonja Participate in the ‘Satyamev Jayate Farmer Cup 2026’ Competition. मौजे भोंजा येथील दोन शेतकरी गटांनी पाणी फाउंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ या राज्यस्तरीय कृषी स्पर्धेत सहभाग नोंदवून तालुक्याच्या कृषी क्षेत्रात नवे पाऊल टाकले आहे. कृषी विभाग व उमेद अभियान यांच्या समन्वयातून राबविण्यात येणारी ही स्पर्धा महाराष्ट्रभर उत्साहात सुरू असून, शाश्वत व फायदेशीर शेतीचा संदेश देणारी ठरत आहे.

महाराष्ट्रातील ३४ जिल्हे आणि ३५१ तालुक्यांमध्ये आठ महिन्यांच्या कालावधीत ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. “शेती अधिक फायदेशीर, शाश्वत आणि समृद्ध बनवणे” हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. गटशेतीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन मिळवणे, खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे यावर भर देण्यात येत आहे.

या स्पर्धेत ११ महिला किंवा पुरुष शेतकऱ्यांनी मिळून किमान १५ एकर क्षेत्रावर अथवा १४ सदस्यांनी १८ एकर क्षेत्रावर खरीप हंगामातील एक पीक निवडून शेती करायची आहे. पाणी फाउंडेशनच्या एसओपी (SOP) मार्गदर्शक तत्वांच्या आधारे स्मार्ट शेती करत अधिक उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिलेल्या निकषांनुसार गुणांकन करून अंतिम विजेते निश्चित करण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक ५० लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ३० लाख रुपये तर तृतीय पारितोषिक २० लाख रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावर महिला शेतकरी गटांसाठी प्रत्येकी तीन गटांना १० लाख रुपयांची विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५ लाख, द्वितीय क्रमांकासाठी ३ लाख आणि तृतीय क्रमांकासाठी २ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून ‘फार्मर कप’ स्पर्धेमुळे हजारो शेतकरी गटांनी उत्पादन वाढ, खर्च नियंत्रण आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून शेतीत सकारात्मक बदल घडवून आणल्याचे दिसून आले आहे. यंदाही ही स्पर्धा राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडणार असून, “एकत्र या आणि शेतीत नवा इतिहास घडवा” असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.

या उपक्रमासाठी तालुका स्तरावर मेंटर व समन्वयक कार्यरत असून, कार्यक्रमावेळी सहाय्यक कृषी अधिकारी विनोद भाग्यवंत, निमंत्रक डायरेक्टर गणेश नेटके, उमेद अभियान व कृषी विभागातील महिला गट सदस्य तसेच श्री साई साम्राज्य महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक प्रियंका मुळीक नेटके उपस्थित होत्या.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!